गोपाळकृष्ण मंदिराजवळ फुले, पुजेचे साहित्य विक्री करण्यास मनाई

0
37

सोलापूर : आषाढी वारी यात्रा कालावधी 3 जुलै ते 13 जुलै 2022 असून यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. चौफाळा येथे गोपाळ कृष्ण मंदिर असून यात्रा कालावधीमध्ये येथे गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी रस्सीचा वापर करावा लागतो. मंदिराजवळ फुले व इतर पुजेचे साहित्य विक्रीसाठी थांबतात. त्यामुळे शिवाजी चौकाकडून, काळा मारुती चौकाकडून येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. याठिकाणी चेंगराचेंगरीसारखा प्रकार टाळण्यासाठी मंदिर परिसरात फुले, हार, फोटो, प्रसादाची विक्री करण्यास मनाई आदेश पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी जारी केला आहे.

        आदेशात ते म्हणतात की, एकादशी दिवशी प्रदशिक्षा मार्गावर सर्व भाविक व दिंड्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यात्रा कालावधीमध्ये 12 ते 14 लाख भाविक पंढरपूर शहरात असतात. मानवी जिविताला धोका होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे गोपाळकृष्ण मंदिर परिसरात 9 जुलै सकाळी 8.00 ते 11 जुलै 2022 च्या रात्री 8.00 वाजेपर्यंत तीन दिवस मंदिराच्या कठड्यावर व मंदिरासमोर हातगाडे, फुले विक्रेते, हार विक्रेते, फोटो विक्रेते, प्रसाद विक्रेते, हात गाडीवाले यांना साहित्य विक्री करण्यास मनाई करण्यात येत आहे. परिसरात फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 कलम प्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर यांनी प्रतिबंधात्मक आदेश पारीत केले आहेत.