मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी अद्याप मदतकार्य सुरू असून अजूनही अनेकजण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोसळली. या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणच्या ढिगाऱ्यामधून अनेकांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमी लोकांवर राजावाडी रुग्णालय आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.