लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यासाठी सोलापूर नगरी सज्ज झाली आहे. महापालिकेने 12 ठिकाणी गणेश विसर्जन व्यवस्था केली असून 51 ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्रे सुरू केली आहेत. नऊ मिरवणूक मार्गावरील 3938 खड्डे बुजवले आहेत अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली. गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य पाण्यात जाऊन जलप्रदूषण होऊ नये यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठानचे 1800 सदस्य आज शहर आणि जिल्ह्यात सेवा देणार आहेत. निर्माल्य संकलन करून त्या माध्यमातून खत निर्मिती केली जाते. शहरात 189 मंडळे मिरवणूक काढणार आहेत या मिरवणुका डॉल्बी आणि डीजे मुक्त असतील असा विश्वास पोलीस आयुक्त राजकुमार यांनी व्यक्त केला. निर्विघ्नपणे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका पार पाडाव्यात यासाठी शहरात 1963 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. ग्रामीण भागात देखील शिस्तबद्ध मिरवणुका पार पाडाव्यात म्हणून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.










