हातभट्ट्यांवर धाडी टाकून 30 गुन्हे दाखल : हातभट्टी दारु व रसायनासह बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
14
  • सोलापूर – दि. 17 व 18 जानेवारी रोजी जिल्हाभरात अवैध हातभट्टी दारु विरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 गुन्हे नोंदविले असून त्यात 1617 लिटर हातभट्टी दारु, 46500 लिटर रसायन, 2 मोटरसायकलीसह एकूण 12 लाख 33 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
  • 17 जानेवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुरप्पा तांडा, दोड्डी तांडा, वरळेगाव तांडा याठिकाणी छापे मारून हातभट्टी निर्मितीकरिता लागणारे 17500 लिटर गुळमिश्रित रसायन व 92 लिटर हातभट्टी दारु जप्त केली. यात वरळेगाव तांड्याच्या हातभट्टी ठिकाणावरुन विश्वनाथ फुलचंद पवार, वय 40 वर्षे या इसमास अटक करण्यात आली. निरिक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाने गुळवंची तांडा ते खेड रोडवर पाळत ठेवून सोमनाथ भागवत लांडगे व अविनाश दत्ता बनसोडे (दोघेही राहणार केगाव ता. उत्तर सोलापूर) या दोन इसमांना सुझुकी एक्सेस 125 मोटरसायकल क्र. MH13-BV-2160 या वाहनातून 3 रबरी ट्यूबमध्ये 210 लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करतांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून दहा हजार आठशे किंमतीच्या हातभट्टी दारु व वाहनासह एकूण पासष्ट हजार आठशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका अन्य कारवाईत निरिक्षक मस्करे यांनी वडाळा येथून भिमराव भानुदास भगत, वय 65 वर्षे या इसमास देशी विदेशी दारुची अवैधरीत्या विक्री करतांना अटक केली असून त्याच्या ताब्यातून इंपेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 5 बाटल्या, किंगफिशर बीअरच्या 8 बाटल्या व देशी दारुच्या 180 मिलीच्या 10 बाटल्या असा रु. दोन हजार नऊशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुय्यम निरिक्षक पुष्पराज देशमुख यांनी त्यांचे जवान चेतन व्हनगुंटी यांच्यासह उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी गावात कांताबाई नवनाथ चव्हाण या महिलेच्या ताब्यातून 30 लिटर हातभट्टी दारु जप्त केली. दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांनी त्यांचे जवान कर्मचारी शोएब बेगमपुरे यांचेसह जुना विडी घरकुल परिसरात राज मेमोरियल शाळेच्या रोडवर पाळत ठेवली असता एका बजाज एम-80 वाहनास अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालक वाहन जागीच सोडून फरार झाला, या कारवाईत वाहनासह 3 रबरी ट्यूबमध्ये वाहतूक करण्यात येत असलेली 270 लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली. माळशिरस विभागाचे निरिक्षक संदिप कदम यांनी त्यांच्या पथकासह माळशिरस तालुक्यातील विझोरी गावाच्या हद्दीतील हातभट्ट्यांवर धाड टाकून 2400 लिटर रसायन जप्त करुन जागीच नाश केले, या कारवाईत शिवाजी रामा भगवे, वय 52 वर्षे या इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दुय्यम निरिक्षक सांगोला यांनी सांगोला तालुक्यातील हतीद गावातील हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून 130 लिटर हातभट्टी दारुसह 900 लिटर रसायन जप्त केले. पंढरपूर विभागाचे निरिक्षक पवन मुळे यांनी त्यांच्या पथकासह वाखरी गावाच्या हद्दीत हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून 600 लिटर रसायन जप्त करुन जागीच नाश केले. तसेच पंढरपुर शहरातील हनुमान नगर येथे सतिश महादेव सर्वगोड या इसमाच्या ताब्यातून 15 लिटर हातभट्टी दारु जप्त करुन त्यास अटक केली
  • 18 जानेवारी बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक आदित्य पवार यांचे नेतृत्वात निरिक्षक अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने मुळेगाव तांडा व गुळवंची तांडा या ठिकाणी हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून तसेच घरांची झडती घेतली असता या कारवाईत 15 गुन्हे नोंदविले असून 830 लिटर हातभट्टी दारु व 24 हजार आठशे लिटर रसायन जप्त केले. या कारवाईदरम्यान धानाबाई चव्हाण, ताराबाई जाधव, विजय चंदू राठोड, नामदेव पवार, बल्लाथ तुळाराम पवार, मिनाक्षी संतोष राठोड, गोपाळ पांडू पवार, नागनाथ देसू राठोड व संतोष हरी चव्हाण यांच्या ताब्यातून हातभट्टी दारु व रसायन जप्त करण्यात आले असून त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची तांडा या ठिकाणी धाडी टाकून संतोष राठोड याच्या ताब्यातून एका रबरी ट्यूब मध्ये ठेवलेली 70 लिटर हातभट्टी दारु व 14 प्लास्टीक बॅरेलमध्ये ठेवलेले 2800 लिटर रसायन जप्त केले तसेच सुनिता रमेश पवार या महिलेच्या ताब्यातून 290 लिटर हातभट्टी जप्त करण्यात आली. तसेच गुळवंची तांडा येथील गोशाळेच्या पाठीमागील ठिकाणावर धाड टाकली असता त्याठिकाणाहून 15 प्लास्टीक बॅरेलमध्ये ठेवलेले 3000 लिटर रसायन व गॅस गोडाऊनच्या पाठीमागील जागेतून 8 प्लास्टीक बॅरेलमध्ये ठेवलेले 1600 लिटर रसायन जप्त करुन जागीच नाश करण्यात आले. सदर पथकाने शिवाजीनगर येथील हातभट्ट्यांवर धाडी टाकून 16 प्लास्टीक बॅरेलमध्ये ठेवलेले 3200 लिटर रसायनासह 82 हजार शंभर रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. प्रभारी दुय्यम निरिक्षक सूरज कुसळे यांनी जवान विकास वडमिले यांचेसह माढा तालुक्यातील मोडनिंब गावामध्ये किसन शंकर कांबळे या इसमास 40 लिटर हातभट्टी दारुसह अटक केली तसेच रोपळे खुर्द गावातील हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून 300 लिटर रसायन जप्त केले.
  • ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संभाजी फडतरे, गुलाब जाधव, सुनिल कदम, सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, सुनिल पाटील, सुरेश झगडे, पुष्पराज देशमुख, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, मुकेश चव्हाण, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडिकट, चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे, प्रियंका कुटे, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, प्रशांत इंगोले व वाहनचालक रशिद शेख, रामचंद्र मदने व मारुती जडगे यांनी पार पाडली.
    सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री ठिकाणे, हातभट्ट्या, धाबे, हॉटेल तसेच गोवा राज्यातून तस्करी होणा-या दारूवर विभागाने लक्ष केंद्रित केले असून त्याविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच रात्रंदिवस सदर पथकाद्वारे पाळत ठेवण्यात येत असून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूकीविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांच्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा.