शासकीय योजनांची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी : खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी; दिशा समिती सभेच्या अध्यक्षस्थानावरून सूचना

0
13

सोलापूर, दि. 18 – सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी दिल्या.

- जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा (दिशा) च्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार बबनदादा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे उपस्थित होते.  

- यावेळी खासदार डॉ. महास्वामी म्हणाले, विकास कामांचे नियोजन करताना सामूहिक तसेच वैयक्तिक योजनेच्या लाभांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तातडीने पात्र लाभार्थीना घरकुल अनुदान द्यावे.  जिल्हयांतर्गत रस्ते तसेच महामार्गाच्या कामांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्यात याव्यात.  जिल्ह्यात शेतकरी, ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देत सर्व मूलभूत सोयीसुविधा गुणवत्तापूर्ण उपलब्ध करुन द्याव्यात. सिंचन विषयक सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरात सुरू असलेली कामे तसेच शहरातील नागरिकांना सम प्रमाणात व मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी तात्काळ पाणीपुरवठा योजना मार्गी लावाव्यात, अशा सूचनाही यावेळी खासदार डॉ.महास्वामी यांनी दिल्या.

- शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी विद्युत उपकेंद्रासाठी नव्याने प्रस्ताव सादर करावेत.  प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री सडक  योजनेची जिल्हयातील रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची होण्यासाठी गुणवत्तापूर्ण काम न करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांना जागा उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील  काही प्रमाणात घरकुले  रखडली असून लाभार्थीना जागा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना राबवाव्यात. तसेच सर्व शासकीय योजनांची माहिती जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयाच्या फलकावर लावावी,  जेणेकरून कोणताही पात्र नागरिक शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही. निराधार योजनेतील अनुदान तात्काळ लाभार्थ्यांना वाटप करावे, अशा सूचना खासदार ओम राजे निंबाळकर यांनी यावेळी दिल्या.

- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात सर्व योजनांतर्गत राबवण्यात येत असलेल्या विकास कामांबाबत माहिती देऊन प्रलंबित कामे संबंधित विभागाकडून कालमर्यादेत पूर्ण करुन घेतली जातील. तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक केले आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच इतरांना आधार कार्ड संबंधित काही अडचणी येतात यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून आधार कार्ड काढून देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- शासकीय योजनांचा लाभ गावातील प्रत्येक पात्र, गरजू नागरिकाला मिळावा यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात कृतीसंगम मेळावे घेऊन  शासनाच्या अनेक योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात आला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी दिली.

- यावेळी बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, एकात्मिक बाल विकास योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, सर्व शिक्षा अभियान ग्रामीण आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.