पाऊण लाखाची गोवा दारु वाहतूक पकडली; 2 वाहनांसह सवा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

0
19

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी कुंभारी (ता दक्षिण सोलापूर) परिसरात कारमधून वाहतूक होणारी शहात्तर हजार आठशे किंमतीची गोवा राज्यातील विदेशी दारु पकडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने लागोपाठ केलेली गोवा दारूविरुद्ध ही दुसरी कारवाई आहे.

सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,ब विभागाच्या पथकास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार त्यांनी रात्री दहा च्या सुमारास सिध्देश्वर साखर कारखाना रोड ते कुंभारी रोडवर, अमन चौकात, कुंभारी ता. दक्षिण सोलापूर या ठिकाणी सापळा लावुन इटियॉस कार क्र. MH-46-W-5460 मधुन गोवा राज्यात विक्रीस असणाऱ्या इम्पिरिअल ब्लू व्हिस्की ब्रॅंडच्या विदेशी मद्याच्या 180 मिली. क्षमतेच्या 384 सीलबंद बाटल्या व 750 मिलीच्या 24 बाटल्या जप्त केल्या. कारमधील दिनेश उध्दव तळभंडारे वय 41 वर्षे, रा. संजय गांधी नगर, सोलापूर व चांदसाब महंमद शरिफ़ पटेल वय 41 वर्षे, रा. कुमठा नाका, सोलापूर या इसमांना अटक केली आहे. पुढील तपासात दोन्ही इसमांना गोवा राज्यात विक्रीस असणाऱ्या विदेशी दारुचा पुरवठा करणारा इसम अमोल दत्तात्रय शिंदे वय 26 वर्षे रा. लांबोटी ता. मोहोळ यास सोलापूर शहरातुन सातरस्ता परिसरातुन अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एक चारचाकी वाहन, एक दुचाकी वाहन MH 13 DS 8085, गोवा राज्यात विक्रीस असणाऱ्या विदेशी मद्य व आरोपींचे वापरते मोबाईल असा एकूण रु.सहा लाख छत्तीस हजार आठशे किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनिल चव्हाण, पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे, अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक अक्षय भरते, रोहिणी गुरव, सहायक दुय्यम निरिक्षक गजानन होळकर, जवान प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व वाहनचालक रशिद शेख यांच्या पथकाने पार पाडली असून गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अक्षय भरते हे करीत आहेत.

आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.