विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बहुपर्यायी प्रश्नांद्वारे; 14 जुलैपासून ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार!

0
17

सोलापूर विद्यापीठ: परीक्षा संचालक डॉ. गणपुर यांची माहिती

सोलापूर, दि.18- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर सर्व विद्याशाखांच्या सर्व सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आता बहुपर्यायी प्रश्नांद्वारे ऑफलाइन पद्धतीने दि. 14 जुलै 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांनी दिली.

विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे बहुपर्यायी प्रश्नांद्वारे परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी ही करण्यात आली होती. त्यानुसार आज कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ प्रशासन प्रमुख अधिकारी व विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक होऊन दि. 20 जून 2022 पासून होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करून या सर्व परीक्षा दि. 14 जुलै 2022 पासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑफलाइन बहुपर्यायी प्रश्नांद्वारे या परीक्षा होतील.

सर्व विद्याशाखांच्या, सर्व अभ्यासक्रमांच्या आणि सर्व सत्रांच्या परीक्षांचा यामध्ये समावेश असून यासंदर्भात सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.