सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात; महापालिकेचे ५०% खर्चाचे दायित्व पेलण्याची सिद्धेश्वर देवस्थान समितीने तत्परता दाखवण्याची गरज.
सोलापूर- सोलापूर शहराचे ऐतिहासिक व धार्मिक वैभव असलेल्या श्री. सिद्धेश्वर तलावाचे जतन, संवर्धन आणि सर्वांगीण पुनरुज्जीवन करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका अत्यंत गांभीर्याने आणि प्राधान्याने काम करत आहे. या बहुप्रतिक्षित प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल आता अंतिम टप्प्यात आला असून लवकरच तो मंजुरीच्या प्रक्रियेत दाखल होत आहे.
सिद्धेश्वर तलाव हा सोलापूरच्या पर्यावरण व पर्यटनाचा मुख्य केंद्रबिंदू असून, त्याचे पुनरुज्जीवन वेळेत व दर्जेदार व्हावे यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या वाट्याला येणाऱ्या एकूण खर्चाच्या ५० टक्के खर्चाचा वाटा श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थान समितीने उचलावा, असे ठोस आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
श्री सिद्धेश्वर मंदिर तलावाचे संवर्धन ही केवळ महापालिकेचीच नव्हे, तर मंदिर समितीचीही तितकीच महत्त्वाची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे. महानगरपालिका आपल्या पातळीवर तांत्रिक बाजू, परवानग्या आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करत आहे.आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रत्यक्ष गती देण्यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीने पुढे येऊन खर्चाच्या ५० टक्के हिश्श्याबाबत विनाविलंब सकारात्मक व ठोस आर्थिक निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. समितीच्या या सहकार्यामुळे निधीची चणचण भासणार नाही आणि सोलापूरकरांचे स्वप्न असलेला सिद्धेश्वर तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करता येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.










