येस न्यूज मराठी : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्रातून १९९९ मधील काँग्रेसमधील राजकीय संघर्षाचे अनेक महत्त्वपूर्ण पैलू समोर आले आहेत. तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार यांनी माझ्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा मला प्रचंड दुःख झाले होते. माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने डोळ्यांत अश्रू आले आणि मी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, अशी आठवण सोनिया गांधी यांनी पुस्तकात मांडली आहे.
१९९९ मध्ये शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांना देशाचे सर्वोच्च नेतृत्व करण्याच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले होते. या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला.
सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे की, अनेक वर्षे सोबत काम केलेल्या सहकाऱ्यांनीच आपल्याला परकी समजावे, ही बाब मनाला लागणारी होती. आपला जन्म परदेशात झाला असला, तरी भारत हाच आपला देश असून देशाशी असलेली निष्ठा कधीही संशयास्पद ठरू शकत नाही, अशी त्यांची भूमिका होती.
या प्रकरणानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहामुळे त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. पुढे शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातील या आठवणींमुळे २७ वर्षांपूर्वीच्या काँग्रेसमधील संघर्षाला पुन्हा उजाळा मिळाला असून महाराष्ट्राच्या राजकारणातही या पुस्तकातील खुलाशांची चर्चा सुरू झाली आहे.











