आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विविध आरोग्य यंत्रणांशी संवाद साधत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमधील चुकीच्या गोष्टींचे पोस्टमार्टम केले. विविध गंभीर प्रकरणे समोर आल्यामुळे त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपुरवाड, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, आरोग्य खात्याची उपसंचालक डॉ भगवान पवार आणि सहसंचालक डॉक्टर कंदेवाड यांच्यासह अनेकांना फैलावर घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय यामधील डॉक्टर तसेच रुग्ण कल्याण समितीच्या सदस्या समवेत विविध विषयावर संवाद साधला. ग्रामीण रुग्णालय वडाळा येथे कार्यरत असलेले डॉक्टर बोरकर, तसेच मंगळवेढ्यात कार्यरत असणाऱ्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर बोदले यांच्या बद्दल अनेकांनी तक्रारीचा पाढा वाचल्यामुळे त्यांना निलंबित करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले. शासकीय सेवेत कार्यरत असताना खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर पंधरा दिवसात कारवाई करून त्याचा रिपोर्ट पाठवा तसेच शहर आणि जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर येत्या आठ दिवसात कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा असे आदेश त्यांनी यावेळी दिले. शासकीय दवाखान्यातील प्रसुती वाढल्या पाहिजे, विविध योजनांचा गरजू रुग्णांपर्यंत लाभ पोहोचला पाहिजे यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे असे आदेश त्यांनी दिले. आषाढी वारीमध्ये खरेदी करण्यात आलेल्या 50 लाख रुपयांच्या चष्मे घोटाळ्यात बाबत तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना वाटण्यात आलेल्या 50 लाख रुपयांच्या प्रमाणपत्र बाबत आणि आशा सेविकांना देण्यात आलेल्या 50 लाख रुपयांच्या कोट चौकशी करू असे आश्वासन त्यांनी पत्रकार परिषदेत दिले. एकूणच आजच्या बैठकीमध्ये आरोग्यमंत्र्यांनी एक प्रकारे आरोग्य यंत्रणेचे पोस्टमार्टम करून अनेकांची मने जिंकली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीसाठी खासदार ज्योती वाघमारे,आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तम जानकर, माजी आमदार दिलीप माने, सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.










