शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक पायलट प्रकल्प तयार करा – उपसभापती नीलम गोऱ्हे

0
70

सोलापूर : कोरोनाने निधन झाल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आले आहेत. त्यांचे पुनर्वसन व्हावे, त्यांना सर्व लाभ मिळावे, यासाठी सामाजिक जबाबदारीतूनन सर्व विभागानी एकत्र येऊन जिल्ह्यातील अशा कुटुंबाच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक पायलट प्रकल्प तयार करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय कोरोनाबाबत आढावा बैठकीत डॉ गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, वैशपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ श्रीमती जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदीप ढेले, पोलीस उपायुक्त डॉ दीपाली घाटे, महिला व बालविकास अधिकारी डॉ विजय खोमणे आदी उपस्थित होते.

गोऱ्हे यांनी सांगितले कि, कोरोनाने निधन झालेल्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे. ते कुटुंब निराधार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. टास्क फोर्स, कृषी, शालेय शिक्षण, आरोग्य, गृह या विभागांसह सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबासाठी एक सर्व समावेशक योजना आखावी. 1896 महिला विधवा झाल्या तर 41 बालकांचे दोन्ही पालक गमावले आहेत. यामुळे बालकांची सध्या नातेवाईक देखभाल व्यवस्थित करतात, याची पाहणी करावी. नातेवाईक सांभाळ करीत नसतील तर त्यांची सोय बालगृहासह सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात करावी. यासाठी प्रशिक्षीत सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. पतीचे निधन झाल्यानंतर त्याचे दुकान असेल किंवा इतर संपत्ती ही पत्नीच्या नावे होण्यासाठी यंत्रणांनी तालुकानिहाय शिबीरे घेऊन काम करावे. महिला शेतकरी असेल तर ती भूमिहीन होणार नाही, याची दक्षताही घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

प्रत्येक महिन्याच्या लोकशाही दिनी महिलांच्या तक्रारीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अधिकारी उपलब्ध असावेत, असे नियोजन करावे. मिशन वात्सल्यमधील सर्व माहिती विधवा महिलांपर्यंत पोहोचवा. शेतकीर महिलांना कृषीविषयक लाभ मिळवून द्यावेत. यामधील लाभ मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव येणे महत्वाचे आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी 65 वर्षे वयाची अट, कमी उत्पन्नाचा दाखला त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, त्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

कोविडमुळे निधन झालेल्या कुटुंबातील सदस्यांना ५० हजारांची मदत शासन देत आहे, याबाबत नागरिकांना माहितीसाठी हेल्पलाईन नंबर द्या. त्यांच्या त्रुटी दूर करून लाभ मिळवून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

घनकचरा आणि जैविक कचरा यांचे व्यवस्थापन होण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या धर्तीवर नगरपालिका, नगरपरिषदेने व्यवस्थापन करावे. यासाठी नगरपालिकांच्या बैठका घेऊन त्यांचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सोलापूर शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी योजना आखाव्यात, वन संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण योजनेचा वापर करावा, स्मार्ट सिटीबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत, याबाबत लेखी स्वरूपात अहवाल देण्याच्या सूचनाही गोऱ्हे यांनी केल्या.

आरोग्य, शिक्षण, महिला व बाल विकास, जैव विविधता याबाबत काय बदल झाले याचेही निरीक्षण नोंदवावे. पुरातन पाण्याचे स्त्रोत शोधून त्याचे जतन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सुंदर माझे कार्यालय या उपक्रमाचे कौतुक करून प्रत्येक ठिकाणी सौर उर्जेचा वापर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवाय पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांच्या ऑपरेशन परिवर्तन या अभियानाचेही त्यांनी कौतुक केले. संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकल्प जाण्यासाठी प्रयत्न करावा, 61 हॉटस्पॉट असलेल्या गावातील महिलांनी अभिनंदन ठराव करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

       यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कोरोना, लसीकरण याबाबतची माहिती दिली. स्वामी यांनी मुलींच्या सायकल बँकेची माहिती दिली. यावेळी गोऱ्हे यांनी कोरोना काळात लाभ मिळालेल्या बांधकाम कामगार, घरेलू कामगार, माथाडी कामगार, रिक्षाचालक यांची माहिती घेतली. लाभ न मिळालेल्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


       यावेळी कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांच्या नावे पाच लाख रूपये ठेव योजनेतील प्रातिनिधीक स्वरूपात मंजूनाथ कांबळे, पूर्वा कांबळे, निखील कांबळे, श्रुतिका सदलापुरे, स्नेहा सदलापुरे, ओम कोरे यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच कोविड काळात महसूल विभागात काम करीत असलेल्या पतीचे निधन झालेल्या राणी साबळे यांना ५० लाखांचा धनादेश श्रीमती गोऱ्हे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी अस्मिता गायकवाड, धनंजय डिकोळे, गुरूशांत धुत्तरगावकर आदी उपस्थित होते.