माढा तालुक्यात एका दिवसात ४३१ कोरोना बाधित
येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यामध्ये नविन २१४७ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यामध्ये २५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे .त्यामध्ये १७ पुरुष व ८ महिला आहेत. चिंतेची बाब म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील २४ वर्षांचा तरुण, मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील ३५ वर्षाची व्यक्ती आणि करमाळा तालुक्यातील कसाब गल्ली येथील ३८ वर्षांची व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडली आहे. जिल्ह्यात माढा तालुक्यात नवीन ४३१ रुग्ण आढळले असून माळशिरस तालुक्यात ३४१,पंढरपूरमध्ये २९०, मंगळवेढा तालुक्यात २०२,बार्शी तालुक्यात १७१, करमाळा १५७, सांगोला १७५ आणि मोहोळ १८०असे नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. चोवीस तासांमध्ये ८८१ व्यक्तींची धोरणांमधून मुक्तता झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. जमाव बंदी आणि संचारबंदी कडक करून पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी जिल्ह्यामधील नवीन कोरोना बाधिताची संख्या कमी होताना दिसत नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.