सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ च्या अनुषंगाने शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच मतदान केंद्रांच्या परिसरात सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील १२ गावांमधील आठवडा बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आदेश जारी केला आहे.
भारत निवडणूक आयोगाने दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार भरविल्यामुळे गर्दी होऊन मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित गावांतील बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या गावांतील आठवडा बाजार राहणार बंद : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप, अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी, करमाळा तालुक्यातील करमाळा, पंढरपूर तालुक्यातील चळे, तारापूर, तुगत, बाभूळगाव, शेळवे व पिराची कुरोली तसेच सांगोला तालुक्यातील जवळा, कोळा व नाझरा येथील शुक्रवारचा आठवडा बाजार दि. २३ ऑक्टोबर रोजी भरविण्यास मनाई करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत, सुरळीत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी संबंधित गावांतील नागरिक, व्यापारी व विक्रेत्यांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.











