माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची शेअर मार्केटमध्ये अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ₹२१.५० लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर येथे दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी गु.र.क्र. ८२४/२०२५ अंतर्गत आरोपी १) राजकुमार विठ्ठल थिटे (रा. कॅन्सर हॉस्पिटलजवळ, आगळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) व २) राजेश सुरजमल भंडारी (रा. भोसरी, जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम ४०६ व ४०९ (सध्याचे भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३१६(२) व ३१८(२)) अन्वये नोंद करण्यात आला होता.
फिर्यादीच्या जबाबानुसार, आरोपी राजकुमार विठ्ठल थिटे यांनी स्वतः शेअर ट्रेडिंग व्यवसाय करीत असल्याचे सांगून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीस कमी रकमेवरील परतावा नियमित देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी, त्यांचे माजी सैनिक पती व इतर नातेवाईकांकडून एकूण ₹२१.५० लाखांची गुंतवणूक करून घेतली. काही काळ परतावा दिल्यानंतर आरोपीने पैसे देणे बंद केले व वारंवार आश्वासने देऊनही गुंतवणुकीची रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी राजकुमार विठ्ठल थिटे यांनी दिनांक २७/०४/२०२६ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
संबंधित प्रकरणात आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की, “अर्शद नियाज खान विरुद्ध झारखंड राज्य, २०२५” या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे की, एकाच घटनाक्रमावर आधारित तथ्यांच्या आधारे फसवणूक व विश्वासघात हे दोन्ही गुन्हे एकाच वेळी अस्तित्वात राहू शकत नाहीत. सदर प्रकरणातही एफआयआरमध्ये हे दोन्ही गुन्हे एकाच व्यवहारावर आधारित नोंदविण्यात आले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एफआयआर टिकू शकत नाही. तसेच तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाले असून आरोपी हा मागील सात महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याच्या पुढील कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
सरकार पक्षातर्फे जामिनास विरोध करण्यात आला असला, तरी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. डी. एन. सुरवसे साहेब यांनी दिनांक ०१ जुलै २०२६ रोजी जामिनाचा अर्ज आरोपी राजकुमार विठ्ठल थिटे यास सशर्त जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनिष बाबरे, ॲड. रोहित थोरात, ॲड. अजय वाघमारे, ॲड. त्वरिता वाघ आणि ॲड. संकेत पवार यांनी काम पाहिले. तसेच मूळ फिर्यादी पक्षातर्फे ॲड. प्रशांत नवगिरे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. दत्ता पवार यांनी काम पाहिले.










