वाशिम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसला (ता. कारंजा), मोहगव्हाण (ता. मंगरुळपीर) आणि जऊळका (ता. मालेगाव) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिक व पाणी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही दिली. या दौऱ्यात परिसरातील पिक व पाणी परिस्थितीची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली.
म्हसला येथील देविदास किशन काळे यांच्या शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीन व तूर पिकाची, मोहगव्हाण येथील शेतकरी अनिल भगरे, अब्दुल नईम शेख रहीम यांच्या शेतातील नुकसानाची, जऊळका येथील शेतकरी संतोष सखाराम डुंबळे यांच्या शेतातील दुष्काळसदृश परिस्थितीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी संतोष यांच्या आई शकुंतलाबाई यांनीही दुष्काळी परिस्थितीची कैफीयत मांडली.
अत्यल्प पाऊसमानामुळे आसमानी संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. संकट काळात शासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांनी कोणतीही चिंता करू नये. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन शासनाकडून आवश्यक मदत प्राधान्याने आणि लवकरात लवकर दिली जाईल. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक नियोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे चारा उपलब्धतेसाठीही दक्षता घेतली जाईल. शेतकऱ्यांना शासनाची मदत थेटपणे मिळण्यासाठी लवकरच कार्यवाही सुरु होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या दौऱ्यादरम्यान खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, आमदार बाबुसिंग महाराज, आमदार सई डहाके, आमदार श्याम खोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार भावना गवळी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण आदी उपस्थित होते.













