यंदा 5 जणांना पद्मविभूषण, 13 जणांना पद्मभूषण आणि 114 दिग्गजांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीतील प्रमुख नावांमध्ये दिवंगत बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, झारखंड राज्याच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते शिबू सोरेन यांना मरणोत्तर पद्मभूषण प्रदान करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आपल्या सुमधुर आवाजाने प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका अलका याज्ञिक यांनाही पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यामुळे चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर, दिग्गज जाहिरातदार पीयूष पांडे यांना मरणोत्तर पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
बॉलिवूडचे कलाकार R माधवन यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील मातीतील कलाकारांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रघूवीर खेडकर, भिकल्या लाडक्या धिंडा यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कलाकारांना पद्मपुरस्कार जाहीर होताच, कला विश्वातून आनंद व्यक्त केला जात आहे.

