सोलापूर महापालिकेच्या मुख्यालयात वर्षानुवर्ष त्याच टेबलला लाखो रुपयांची कमाई करत चिटकून बसलेल्या ज्युनिअर इंजिनियर तसेच खाते प्रमुखांच्या बदल्यांवर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांची सही झाली आहे. मात्र काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील जुनिअर इंजिनियर तसेच खाते प्रमुखांना चॉईस पोस्टिंग द्यावे यासाठी आग्रह धरल्यामुळे ऑर्डर बाहेर लिक झाल्या नाहीत. आयुक्त सचिन ओंबासे हे शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर होते आणि आज उद्या सुट्टी असल्यामुळे सोमवारी या सुमारे 200 कर्मचाऱ्यांना बदल्यांचा झटका दिला जाणार आहे. रस्ते,बांधकाम, भूमी मालमत्ता,टाऊन प्लॅनिंग, टॅक्स या विभागात कंत्राटी कर्मचारी वरचढ झाले असून त्यांनी अनेक कॉन्ट्रॅक्टर सोबत मिली भगत असल्यामुळे कामाचा दर्जा ढीसाळ झाला आहे. आयुक्तांनी आदेश देऊनही काही खाते त्यांचे ऐकत नाहीत. काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ठराविक अधिकाऱ्यांवर वरदहस्त ठेवल्यामुळे महापालिकेतील प्रशासकीय शिस्त बिघडू लागली आहे. आता सुमारे 200 कर्मचाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार असल्यामुळे महापालिकेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.








