प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे सोलापूर आकाशवाणीचे नवे कार्यक्रम विभाग प्रमुख

0
16

सोलापूर, दि.५ : राजेंद्र दासरी यांच्या बदलीनंतर काल प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे यांनी सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम विभाग प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

 इंटरनेट क्रांतीमुळं माहिती आणि मनोरंजनाचे अमर्याद स्त्रोत खुले झाले असले तरी निर्भेळ मनोरंजन आणि समाज उपयोगी आशयाची निर्मिती हे आकाशवाणीचं वेगळेपण असल्याचं ते म्हणाले.

माहिती आणि घटनांचे वृत्त जलद गतीनं प्रसारित करण्याची स्पर्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दिसून येते. गतीमान प्रसारणासोबत विश्वासार्ह आणि संतुलित माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोलापूर आकाशवाणी कटीबद्ध असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं.

सोलापूर आकाशवाणी हे स्थानिक जनतेच्या हक्काचं माध्यम असून विज्ञान,अर्थ, कृषी, शिक्षण,कला, साहित्य, क्रीडा, प्रशासन, पत्रकारिता, समाजसेवा अशा सर्व क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंतांना आकाशवाणीच्या कार्यक्रमांत सहभागी करुन घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

 SMS वर आधारित कार्यक्रम, फोन इन कार्यक्रम, वॉक्स-पॉप, टॉकलेट्स आणि ऑडिओ रील्स अशा नवीन स्वरूपाच्या कार्यक्रमांची निर्मिती सोलापूर आकाशवाणी कडून केली जात आहे शिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन आकाशवाणीचे कार्यक्रम समाज माध्यमांतून जास्तीत जास्त  श्रोत्यांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

लोकसेवा प्रसारक असलेल्या आकाशवाणीला जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी रसिक श्रोत्यांनी आपल्या आवडी-निवडी आणि अभिप्राय पत्र, SMS किंवा ई-मेलच्या माध्यमातून कळवण्याचे आवाहन सुजित बनसोडे यांनी केले.