सोलापूर बाळासाहेब सरवदे यांच्या खून केल्याप्रकरणी अटकेत असलेली भाजपा नगरसेविका शालन शंकर शिंदे रा. जोशी गल्ली सोलापूर यांना कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरूज पठाण यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की यातील मयत बाळासाहेब सरवदे हा म.न.से. पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष म्हणून काम करीत होता. मयत बाळासाहेब याची चुलत वहिनी रेखा सरवदे हिने अपक्ष म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता त्यावेळी शालन शंकर शिंदे हिने देखील निवडणुकी करिता अर्ज भरला होता.
दि. २/०१/२०२६ रोजी दुपारी एक वाजाच्या सुमारास आरोपी शालन शंकर शिंदे व इतर आरोपी हे घरासमोर येऊन तुमचा अपक्ष अर्ज काढून घ्या नाहीतर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली होती. त्यावेळी गल्लीत वाद नको म्हणून रेखा सरवदे हिने निवडणुकीकरिता भरलेला अर्ज काढून घेतला.
त्यानंतर सायंकाळी ४.४५ वाजाच्या सुमारास मयत बाळासाहेब सरवदे, बाजीराव सरवदे, आदित्य सरवदे असे हनुमान मंदिराजवळ थांबले असता शंकर शिंदे याची मुले व इतर लोक हे आरडाओरडा करीत आले व त्यांनी त्यांच्या सोबत भांडण सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये तलवारी, कोयते होते. शालन शिंदे व शारदा शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे याच्या डोळ्यात चटणी टाकली व इतर आरोपींनी त्यांच्या हातातील हत्यारांनी सपासप वार करून गंभीर जखमी करून त्याचा खून केला. अशा आशियाची फिर्याद त्याचा भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे याने जेलरोड पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यावरून पोलिसांनी तपास करून नगरसेविका शालन शिंदे हीस अटक केली होती. जामीन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात शालन शिंदे हिने अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर नगरसेविका शालन शिंदे आपल्या जामीन मिळावा म्हणून ऍड. रितेश थोबडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीवेळी ऍड. रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल असून दोषारूप पत्राचे अवलोकन केले असता सुरुवातीस अपघाती मृत्यू तसेच नेत्र साक्षीदारांचे जबाब व फिर्यादी जबाब हे सुसंगत नसल्याचा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी एक लाख रुपयांच्या जात मुचुलक्यावर जामीन मंजूर केला.यात सरकारतर्फे ऍड. ए.ए. टक्कळकर तर आरोपीतर्फे ऍड. रितेश थोबडे यांनी काम पाहिले.










