तुळजापूर : शहरातील प्रतीक्षा पुणेकर या 18 वर्षीय मुलीच्या कुटुंबियांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबातील सर्वांना ताब्यात घेतले आहे. मुलीचे वडील प्रकाश पुणेकर आणि आई संजीवनी पुणेकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती.
वेताळ नगर भागात राहणारे प्रकाश पुणेकर आणि संजीवनी पुणेकर यांची एकुलती एक मुलगी प्रतीक्षा पुणेकर हिला उलटी होऊन पोटात दुखू लागले . त्यामुळे तिला शहरातील कुतवळ हॉस्पिटलमध्ये 4 फेब्रुवारी 2020 मध्ये दाखल करण्यात आले होते . चार दिवस कुतवळ हॉस्पिटलमध्ये मुलीला ठेवण्यात आले आणि त्यानंतर 8 फेब्रुवारी 2020 ला पहाटे अचानक मुलीला सोलापूरला नेण्यास डॉक्टरांनी सांगितले. दुर्दैवाने त्याच दिवशी मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉ. दिग्विजय कुतवळ यांच्याविरुद्ध वारंवार तक्रारी देऊनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नसल्याने मुलीच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.