सोलापूर शहरात गेल्या दोन दिवसात अवघा आठ ते दहा मिनिटे पाऊस झाला. मात्र शहरातील कोणत्याही रस्त्यावरून फेरफटका मारला तरी त्या रस्त्यावर आपणास पावसाच्या पाण्याची तळी साचल्याचे दृश्य दिसेल. रस्त्यावरील खड्डे तर पाचवीला पुजले आहेत. आजूबाजूला अस्वच्छता.. रस्त्यावरून वाहणारे ड्रेनेजचे घाण पाणी पाहिल्यावर महापालिका आणि त्यांचे झोन अधिकारी तसेच त्यांचे वरिष्ठ अधिकारी झोपा काढत आहेत असेच काहीसे दृश्य आहे. एसटी स्टँड समोरील सुमारे 200 मीटर रस्ता ड्रेनेज टाकण्यासाठी खोदला तो तसाच अर्धवट सोडून देण्यात आला आहे आणि त्यावरून वाहतूक सुरु केली आहे. नवीवेस पोलीस चौकी पासून भागवत थिएटरपर्यंत ड्रेनेजचे घाण पाणी वाहत आहे. शहरातील विविध रस्त्यावर कुठे ड्रेनेजसाठी तर कुठे पाण्यासाठी महापालिकेने रस्ते खोदून ठेवले आहेत. ऐन उन्हाळ्यामध्ये कुठेही रस्ते करण्यात आले नाही आणि आता पावसाळ्यात काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहे हे अजब. रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी थांबले की तो रस्ता खराब होतो… त्यामुळे जनतेने टॅक्स रूपाने भरलेल्या पैशाची महापालिका उधळपट्टी करत असल्याचेच दिसते.









