सोलापूर : मानवाचा मेंदू क्रियाशील ठेवायचा असेल तर बळीराजा विशेषांक प्रत्येकाने वाचायलाच हवा, इंटरनेटच्या आधुनिक युगातही वाचन संस्कृती टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे तसेच कौतुकास्पद काम मराठा मार्ग गेली पंचवीस वर्षे अखंडीतपणे करत आहे, असे प्रतिपादन महापारेषणचे कार्यकारी अभियंता नवनाथ चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष संजय जाधव, तानाजी चटके, आर. पी. पाटील, शहराध्यक्ष सदाशिव पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील होते.
मराठा मार्ग मासिकाला २५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने मराठा मार्गच्या बळीराजा विशेषांकाचे मुख्य प्रकाशन बलिप्रतिपदेच्या दिवशी नागपूर येथील बळीराजा संशोधन केंद्रात झाले. शेतकरी कष्टकरी, दीन-दलित यांची सुख-दु:ख, आरोग्य, शेती, व्यापार, अर्थकारण आणि समाज प्रबोधन अशा विषयांना स्पर्श करीत हा विषेशांक तयार करण्यात आला आहे.
याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे दत्तात्रय मस्के, वधू-वर कक्षाचे गोवर्धन गुंड, अंबादास सपकाळे, वीर भगतसींग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष परशुराम पवार महापारेषणचे उप अभियंता अमेय केत, एम. एस. ई. बी. पतसंस्थेचे चेअरमन मोहन पाटील, विजय जगताप यांच्यासह सेवा संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी तर दत्तात्रय मस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.