सोलापूर- ( प्रतिनिधी ) – युवकांमुळे आज महाराष्ट्रात “आपलं ठाकरे सरकार” सत्तेत आलं आहे.त्यामुळे युवकांनी जनहिताच्या कामाला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांनी केले. सोलापूर शहर – जिल्हा युवा सेनेच्यावतीने गुरुवारी शिवस्मारक सभागृहात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना रुपेश कदम बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी रुपेश कदम यांच्यासह युवा सेनेचे राज्य विस्तारक तथा सहसचिव विपुल पिंगळे यांच्या हस्ते युवा सेनेत प्रवेश केलेल्या सागर शिंदे,रोहित हंचाटे,गणेश परबत,उद्या भोसले,अभिषेक दुडका,ऍड. दयानंद शिंदे,अर्जुन शिवसिंगवाले, सुरज शेख,रणजित भंडारे आदी युवकांच्या गळ्यात भगवे उपरणेघालून मनगटावर शिवबंधन बांधण्यात आले. तसेच नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठीच्या युवा सेनेच्या सोलापूर हेल्पलाईन ( ८५५४०५००५० ) क्रमांकाच्या फलकाचे थाटात अनावरणही करण्यात आले.
रुपेश कदम म्हणाले,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले आहे. युवकांमुळेच राज्यात ठाकरे सरकार आले आहे. आता आगामी काळात जनतेच्या अडचणी सोडविण्याचा प्राधान्य देणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आणायची असेल तर पक्षाची बांधणी होणे महत्वाचे आहे.पुढील तीन महिन्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात बूथ तिथे यूथ च्या माध्यमातून प्रत्येक बूथला एक युवा सेनेचा पदाधिकारी असावा,गाव तिथे शाखा उपक्रमाला गती मिळावी,मतदार नोंदणीसह शिवसेना सदस्य नोंदणी तसेच शासनाच्या योजनांची माहिती युवा सैनिकांना होण्यासाठी शिबिरे घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.तसेच हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देण्याबाबतसुद्धा कदम यांनी सूतोवाच केले. सत्तेचा वापर नागरिकांसाठी करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा असेही ते म्हणाले.
युवा सैनिकांनी आपल्याला मिळालेल्या पदाचा वापर समाजोपयोगी कामासाठी केला पाहिजे. पदांबरोबर आता आपली सर्वांची जबाबदारीसुद्धा वाढली आहे. त्या अनुषंगाने यशाने हुरळून न जात जनतेच्या कामाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे शिवसेनेचे शहराध्यक्ष गुरूशांत धुत्तरगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. अखिल भारतीय विध्यार्थी सेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून यातील पदाधिकाऱ्यांना युवा सेनेत सामावून घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून विचार व्हावा असेही धुत्तरगावकर यांनी सुचविले.
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता असून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता कामाची गती वाढविली पाहिजे.मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विचाराने बाळासाहेबांना दैवत मानून युवा सैनिक काम करत आहे.आगामी काळात सोलापूरची कामगिरी आणखी उंचावेल.
सोलापूरचा युवा सैनिक वायू सेनेप्रमाणे काम करत असल्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात भगवा डौलाने फडकत असल्याचे युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले. सोलापुरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम युवा सेनेने केले आहे.युवकांचे संघठन उभे करण्याबरोबरच त्या माध्यमातून सोलापुरातील शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल वानकर यांनी जाहीर केलेल्या युवा सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावाला सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात संमती दिली.
याप्रसंगी योगेश भोसले,शुभम घोलप,सागर शिंदे,अमर बोडा,राहुल गंधुरे,दयानंद शिंदे,रोहित हंचाटे,गुरुनाथ शिंदे,बालाजी चौगुले,योगीराज पाटील,अर्जुन शिवसिंगवाले,काशी विभुते,संकेत गोटे,अमितकुमार गडगी,अविनाश राठोड,यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.