सोलापूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी कामच करत नाहीत, अशी ओरड वारंवार नगरसेवक आणि नागरिक करतात. याला महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी देखील दुजोरा दिला. मी अधिकाऱ्यांना सांगतोय मात्र कोणी कामच करीत नाही, तर मी काय करू? अशी हतबलता आयुक्तांनी नगरसेवकांसमोर बोलून दाखवली. जे कर्मचारी- अधिकारी काम करत नाहीत, त्यांना मारा …अशा शब्दात आयुक्तांनी नगरसेवक सत्यजित वाघमोडे, किरण पवार तसेच माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासमोर वक्तव्य केले. एवढेच नव्हे तर महापालिकेत काम करणे आणि आत्महत्या करणे एकसमान असल्याचे देखील ते म्हणाले. स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांनी देखील आयुक्तांना भेटून अधिकाऱ्यांची तक्रार केली. अधिकारी कर्मचारी काही केल्या कामेच करत नाहीत असे चाकोते देखील म्हणाल्या. एकूणच महापालिकेची प्रशासकीय शिस्त पूर्णपणे बिघडली असून आयुक्तांचे प्रशासनावरील कंट्रोल सुटले आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतो… त्यांच्यावर कारवाई करतो अशी वक्तव्य वक्तव्य ते करतात. मात्र ते हतबल झाले आहेत. नगरसेवक- पदाधिकारी त्यांना काम करू देत नाहीत की काही ठराविक अधिकारी चुकीचे फीडिंग करून त्यांना सुधरू देत नाहीत हे मात्र मोठे कोडे पडले आहे. काम न करणाऱ्या अधिकाऱ्याला मारा…. महापालिकेत काम करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच आहे… ही आयुक्तांची वक्तव्ये आता चांगलीच गाजणार असे दिसते.









