सोलापूर महापालिकेच्या तत्कालीन नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यासह 19 अधिकारी आणि कर्मचारी हे महापालिकेच्या नाले सफाई घोटाळ्यात अडकल्याचे चौकशी अहवालात सिद्ध झाले. महापालिका आयुक्तांना 18 ऑगस्ट रोजी या चार अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने अहवाल दिला. मात्र महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडून या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई न करता उलट त्यांची पाठराखण केली जात आहे. चौकशी अहवालानुसार कारवाई करणे अपेक्षित असताना पुन्हा त्यांना कारणे दाखवा नोटिसा कशासाठी बजावल्या, आयुक्त मुद्दाम टाइमपास करत आहेत असा आरोप भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी केला आहे. रंजीत टूर्स अँड ट्रॅव्हल्स याला 84 लाख रुपये ज्यादा दिले आहे हे चौकशी अहवाला सिद्ध झाल आहे. तरीही आयुक्त कारवाई करत नसल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण झाली आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करणे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे त्यांच्या विरोधात पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणारा असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.










