पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक तथा वरिष्ठ प्राध्यापक डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने शासन निर्णय निर्गमित करून आज हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे वितरण दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील हे शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर केंद्रापासून या विद्यापीठांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 22 विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. तर सध्या पाच विद्यार्थी पीएच. डी. चे संशोधन करत आहेत
डॉ. पाटील यांना यापूर्वी देखील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याबरोबरच त्यांच्या नावावर एकूण 7 पेटंट आणि संशोधन प्रकल्प 16 आहेत. भौतिकशास्त्र विषयातील गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी त्यांची ओळख आहे. डॉ. पाटील यांच्या शैक्षणिक व संशोधन कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
प्रा. डॉ. विकास पाटील यांना मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर प्र – कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, डॉ. अजय जाधव, प्र- कुलसचिव डॉ. अतुल लकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखा अधिकारी सीए डॉ. महादेव खराडे, विद्यापीठातील सर्व संविधानिक अधिकारी, सर्व संकुलाचे संचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी प्रा. डॉ. विकास पाटील यांचे अभिनंदन केले.









