भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे आणि उजनी धरणाची पाणी पातळी 100% एवढी नियंत्रित केली जात असल्यामुळे आज दुपारी दीड वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीत तब्बल ७० हजार क्युसेक एवढे पाणी सोडले जात आहे. तसेच वीरधरणातून नीरा नदीत 24 हजार दोनशे क्युसेक एवढे पाणी सोडले आहे. हे पाणी नीरा नरसिंगपूर येथील संगम मध्ये भीमा नदीत मिसळणार आहे. त्यामुळे उद्यापासून भीमा नदी पात्रात तब्बल ९४ हजार क्युसेक एवढा पाण्याचा प्रवाह असणार आहे. भीमा नदीतून पंचवीस हजार क्युसेक पाणी सोडले तरीही पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली जातो त्यामुळे 25 जुलैपासून हा दगडी फुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
चंद्रभागा वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. आता ९४ हजार क्युसेक एवढे पाणी येणार असून जर पाणी एक लाख क्युसेक च्या पुढे गेले तर पंढरपूर शहरात पाणी घुसायला सुरुवात होते. त्यामुळे आता भीमा नदी काठाला पुराचा नव्हे तर महापुराचा धोका संभवत आहे. भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली आहेत. एकीकडे जिल्ह्यामध्ये पावसाचा पत्ता नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर भीमेतून पाणी वाहून जाऊ लागले आहे. ते पाणी अडवण्यासाठी काहीतरी दीर्घकालीन उपाययोजना करणे राज्यकर्त्यांचं काम आहे. नाहीतर धरण उशाला आणि कोरड घशाला अशी जिल्ह्याच्या अर्ध्या भागाची अवस्था राहणार आहे.






