सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे एकदिवसीय कायदेविषयक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भारताचे माजी सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण गवई भूषविणार आहेत.
या परिषदेस उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.निजामोद्दीन जे. जमादार, मा. न्यायमूर्ती मिलींद जाधव तसेच माजी न्यायमूर्ती विनय जोशी यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. विविध कायदेविषयक विषयांवर मान्यवर न्यायमूर्ती व वरिष्ठ विधिज्ञ आपले विचार मांडणार असून, न्यायव्यवस्था, वकिली व्यवसायातील नैतिकता, न्यायदान प्रक्रियेत वकिलांची भूमिका तसेच बदलत्या कायदेशीर संकल्पनांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर परिषदेस उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, वरिष्ठ विधिज्ञ, महाराष्ट्रातील विविध बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील बंधू-भगिनी तसेच विविध विधी महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.कायदेविषयक ज्ञानाची देवाणघेवाण, न्यायालयीन कार्यपद्धतीतील बदल, आणि न्यायव्यवस्थेतील घडामोडींवर चर्चा घडवून आणणारी ही परिषद विधी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या ऐतिहासिक कायदेविषयक परिषदेस जास्तीत जास्त वकील बंधू-भगिनी, विधी महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर याचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.










