श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीने भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
सोलापूर : संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त आणि अधिक मासाच्या औचित्याने सोलापुरात ७५० भक्तांच्या सहभागातून भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जून ते १२ जून या कालावधीत हा सोहळा उत्साहात पार पडणार असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीचे अध्यक्ष सतीश मालू यांनी दिली.
५ जून रोजी दुपारी १ वाजता सोहळ्याचे उद्घाटन आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर माउली देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज यांच्या हस्ते होणार आहे. तर १२ जून रोजी काल्याच्या कीर्तनासाठी विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष सद्गुरु ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित राहणार आहेत. कीर्तनानंतर अयोध्येचे जगद्गुरु डॉ. राघवाचार्य यांचे आशीर्वचन होणार आहे.
या पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. काशीनाथ महाराज सर्जे करणार असून ९ वर्षांपासून ते ८३ वर्षांपर्यंतचे भाविक यात सहभागी होणार आहेत. दररोज दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत पारायण होणार आहे. सहभागी भाविकांसाठी अल्पोपहार, चहा व सरबताची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही, अशा सर्वांना भेट स्वरूपात ग्रंथ देण्यात येणार आहेत. ही ग्रंथसेवा सीमाताई खोडके यांनी केली आहे.
लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यासाठी अनेक भक्तांनी योगदान दिले आहे. राघवेंद्र जामगुंडी यांनी जामगुंडी लॉन्स आठ दिवस सेवा स्वरूपात उपलब्ध करून दिले असून महाप्रसादाची सेवाही त्यांनी स्वीकारली आहे.
भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय कक्ष उभारण्यात आला आहे. वैद्य मेघा वनारोटे यांच्या नेतृत्वाखाली विविध डॉक्टरांची टीम प्राथमिक उपचार व औषधोपचार सेवा देणार आहे.
१२ जून रोजी सकाळी ७ वाजता आसरा दत्त मंदिरापासून भव्य ग्रंथदिंडी निघणार असून त्यानंतर कीर्तन, आशीर्वचन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे मार्गदर्शक राघवेंद्र जामगुंडी, नामदेव पुकळे आणि डॉ. अनिल सर्जे यांनी केले आहे.










