सोलापूर : येथील राधा किशन फोमरा मूकबधिर विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेचे सचिव तथा प्रमुख पाहुणे सुनील दावडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सुनील दावडा यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांचे समाजासाठीचे अद्वितीय योगदान अधोरेखित केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताचे संविधान निर्माता नसून ते एक महान विचारवंत, समाजसुधारक आणि खऱ्या अर्थाने युगपुरुष होते. त्यांनी शिक्षण, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाज घडवण्याचे कार्य केले,” असे ते म्हणाले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, आपल्या आयुष्यात कठोर परिश्रम व शिस्त यांचे पालन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वाचा उपचार शिक्षक अजित पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली उपयुक्तता स्पष्ट केली. त्यानंतर प्रमुख पाहुणे सुनील दावडा यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
या प्रसंगी शाळेतील शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे, रेणुका पसपूले, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, योगिता बोधले, अश्विनी ढोणे, दिनेश ताटे, नागनाथ बसाते, सकलन बदेखान, आनंद पारेकर, चिदानंद बेनुरे, साहेबगौड पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, शबाना शेख आदींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अजित पाटील यांनी प्रभावीपणे केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमातून प्रेरणा घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.

