सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि विशेषता शेवटच्या तासात अर्ज भरण्यासाठी न भूतो अशी गर्दी नॉर्थकोट प्रशालेत झाली होती. नॉर्थकोट प्रशालेच्या बाहेर दर्शन रांग लागावी याप्रमाणे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रांग लागली होती. काँग्रेसने 51 जणांचे एबी फॉर्म दीड वाजताच माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी दाखल केले. मात्र भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे तीन वाजता धावपळ करत भाजप उमेदवारांचे एबी फॉर्म त्या त्या कार्यालयाकडे सादर केले. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक दोन आणि चार या ठिकाणी त्यांना वेळेत येता आले नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे दरवाजे बंद झाले त्यामुळे त्यांचे एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांकडे वेळेत दिले नाहीत असा आरोप शिंदे सेना, काँग्रेस आणि ठाकरे सेना यांच्याकडून करण्यात आला. दोन तास विरोधकांनी त्यांनी निवडणूक कार्यालया बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले आणि भाजपवर संविधान पायाखाली तुडवत असल्याचा आरोप केला. शिंदे सेनेचे अमोल शिंदे, चेतन नरोटे यांनी भाजपवर सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला. तर आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले आमच्या उमेदवाराचे एबी फॉर्म वेळेच्या आतच आम्ही दाखल केले आहेत. विरोधकाकडून ही स्टंटबाजी केली असे सांगितले. याबाबत वस्तुस्थिती काय असे महापालिका आयुक्त यांना विचारले मात्र त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याकडे कोणतीही अधिकृत माहिती आली नाही असे सांगत हात झटकले. विरोधी पक्षाने तक्रारी अर्ज दिला असून त्यानुसार तपासणी करू असे ते म्हणाले. वास्तविक पाहता आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि रोहिणी तडवळकर या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक दोन आणि चार मध्ये पळत आल्या मात्र तीन वाजून गेले होते म्हणून त्यांना कार्यालयात जाता आले नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एबी फॉर्म कोणी दाखल केले हे गुलदस्त्यात आहे. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच कायदेशीरपणे ताणला तर प्रभाग क्रमांक दहा, 11 12 आणि 13 तसेच प्रभाग क्रमांक पाच, सहा, सात आणि पंधरा अशा एकूण आठ प्रभागातील एकूण 32 भाजप उमेदवारांचे भवितव्य अडचणीत येऊ शकते.







