सोलापूर महापालिकेसाठी आज विविध पक्षातील उमेदवारांनी वाजत गाजत तर काही जणांनी गुपचूप पणे उमेदवारी अर्ज दाखल केले. बंडखोरी टाळण्यासाठी भाजप उद्या दुपारी दोन वाजता एबी फॉर्म देणार आहे. ज्यांची तिकिटे फायनल आहेत अशा भाजप उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखल केले. उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेकांनी बंडाचे निशाण फडकवत उमेदवारी दाखल केली. कुणाच्या खांद्यावर कुणाचे झेंडे आहेत हेच समजेना झाले आहे. आजच्या दिवशी माजी महापौर श्रीकांत यन्नम, अलका राठोड, आनंद चंदनशिवे, उत्तरा बर्डे, किरण देशमुख, नाना काळे, नरेंद्र काळे, अश्विनी चव्हाण, लक्ष्मण जाधव, केदार उंबरजे, बिजू प्रधाने, संगीता जाधव यांच्यासह अनेक जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज गर्दी झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच नॉर्थकोट प्रशालेचे गेटवर इच्छुक उमेदवारांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. आज अखेर सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी एकूण ३१६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

