मुंबई – आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जागावाटप तसेच उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असून महायुतीमध्ये यावरून अंतर्गत मतभेद देखील होत असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शिंदेंचे सख्खे भाचे आशिष माने यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत आशिष माने यांनी प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाचे आशिष माने यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 159 मधून उमेदवारी देखील देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे समजते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हा मुंबईत मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या घटनेवरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आशिष माने यांच्यासह भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांना देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. नेहा राठोड यांना प्रभाग क्रमांक 156 मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून, 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. अर्ज भरण्यासाठी आता केवळ 30 डिसेंबरपर्यंतची मुदत शिल्लक असल्याने इच्छुकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. या निवडणूक वेळापत्रकानुसार, 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होईल, तर 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान पार पडणार असून 16 जानेवारीला या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
मतदानाला अवघे 18 दिवस उरले असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. केवळ ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा झाली असली, तरी इतर प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाचे त्रांगडे अद्याप कायम आहे. मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढण्याची चिन्हे आहेत, तर पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे. विशेषतः ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सहा महानगरपालिका असून, या ठिकाणी जागावाटपावरून भाजप आणि शिंदे सेनेत अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

