सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी नामनिर्देशन भरणाऱ्या व्यक्तींसाठी आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या व्यक्तींसाठी विविध प्रकारचे निर्बंध घातले आहेत. याबाबतचा आदेश त्यांनी आजच जाहीर केला आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नॉर्थकोट प्रशाला येथे कार्यालय असणार आहे. त्यामुळे नॉर्थकोट प्रशाला येथील मुख्य प्रवेशद्वारापासून 100 मीटर परिसरात व्यक्तीच्या प्रवेश आणि मोटार वाहन यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. नॉर्थकोट प्रशालेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 100 मीटर परिघा पर्यंत तीन पेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने आणण्यास प्रतिबंध घातला आहे. पोलिसांनी ठरवून दिलेल्याच ठिकाणी गाड्या पार्किंग कराव्या लागतील. प्रत्येक उमेदवारास अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात एका वेळी उमेदवारांसह.. सूचकासह पाच पेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 100 मीटर परिसरात कोणताही प्रचार, घोषणा देणे वाद्य वाजवणे तसेच गाणी वाजवणे यावर पोलिस आयुक्तांनी निर्बंध घातले आहेत. हा आदेश 23 डिसेंबर पासून तीन जानेवारीपर्यंत लागू असणार आहे याची अंमलबजावणी करावी अन्यथा आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध कारवाई करणार असल्याचा इशारा या आदेशातून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या आदेशातून दिला आहे.

