येस न्युज मराठी नेटवर्क : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अटक करण्यात आली. ज्याबाबत बोलताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. “अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची कारवाई ही काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकारची मानसिकता दाखवणारी आहे. लोकशाही आणि पत्रकारितेचं स्वातंत्र्य यांना हा मोठा धक्का आहे” अशा शब्दात जगत प्रकाश नड्डा यांनी टीका केली आहे.
काय आहे प्रकरण?
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.