सोलापूर शहरातील दमानी नगर येथील रेल्वे ब्रिज पाडकामाची प्रक्रिया आजपासून रेल्वे आणि महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू झाली. यासाठी आज सकाळीच मरीआई चौक तसेच अण्णाभाऊ साठे चौक अर्थात भैय्या चौकातून या रेल्वे ब्रिजवरून जाणारी वाहतूक पत्रे लावून बंद करण्यात आली. दुपारी दोन नंतर या रेल्वे ब्रिजच्या कडेला असलेले लोखंडी ग्रील तसेच रेलींग काढण्याचे काम सुरू झाले. ब्रिज वरचे डांबरीकरण देखील काढले असून विविध यंत्रणा संयुक्तपणे एकाच वेळी कामाला लागल्या आहेत. विद्युत केबल तसेच ऑप्टिकल फायबर च्या केबल शिफ्ट करणे यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू झाले आहे. 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता 200 टनाचे तीन क्रेन गॅस कटरच्या सहाय्याने या रेल्वे ब्रिजचे तुकडे करून उचलणार आहेत. यासाठी 12 तासांचा रेल्वेने मेगाब्लॉक घेतला आहे. नवीन रेल्वे ब्रिज हा मरीआई चौकात सुरू होऊन तो भैय्या चौकात संपेल. नवा ब्रिज सातशे मीटर लांब असेल . सात- सात मीटर चे दोन मुख्य मार्ग तसेच दोन्ही बाजूला पाच मीटरचे सर्विस रोड असणार आहेत . सध्याच्या रेल्वे ब्रीच उंची 5 मिटर असून नव्या ब्रिज ची उंची 7 असणार आहे . 35 कोटी रुपयांच्या या कामाची वर्क ऑर्डर एन एच ए आय ने गोयल इन्फ्रा यांना दिली असून वर्षभरात काम करण्याचे टार्गेट आहे.

