सोलापूर:- सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकांसाठी सेतू सुविधा केंद्र चालवण्यात येत होते. त्यांना तातडीने सुविधा उपलब्ध होत होती. परंतू मुदत संपल्या कारणाने शासनाकडून हे सुविधा केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सेतू सुविधा केंद्र चालू करावे असे निवेदन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर व निवासी जिल्हाधिकारी शमा पवार यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेले हे मध्यवर्ती ठिकाणी व सोयीचे असल्याने सर्व सामान्य लोकांना याचा फायदा होत होता परंतू या निर्णयामुळे सर्व सामान्य लोकांना नाहक त्रास होत आहे. विविध दाखल्यांसाठी खाजगी लोकांकडे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक लूट होण्याची शक्यता आहे, तसेच कागदपत्रांची बोगसगिरी पण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे शासनाने याचा फेरविचार करून तातडीने सेतू सुविधा केंद्र चालु करुन सर्वसामान्य लोकांना दिलासा द्यावा. तसेच तातडीने आदेश काढून सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात यावे अन्यथा या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्यात असा इशारा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी दिला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, ज्योतिबा गुंड, महेश कुलकर्णी, मुस्सा अत्तार, ऋषीकेश शिंदे, विकास शिंदे, शरद येच्चे इत्यादी उपस्थित होते.