येस न्युज मराठी नेटवर्क : मनात जिद्द असली की कुठल्याही प्रकारचे शारीरिक व्यंग यशाच्या आड येत नाही. नागपूरच्या हरीश प्रजापती या तरुणाने नेमकं हेच सिद्ध करून दाखवले आहे. बालपणापासून 90 टक्के अंधत्व असलेल्या हरीश प्रजापतीने कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात “हम तो जीतेंगे” हे सर्वाना प्रेरणादायी पुस्तक लिहिले. लहान बालकांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना प्रेरणा देणारे हे पुस्तक आता प्रकाशित झाले आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयात लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात आम्ही घरात बसून काय करावे अशा कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला हरीश ने एक समर्पक उत्तरही दिले आहे.
कोरोना महामारी प्रत्येकाच्या जीवनात काही तरी अडचण घेऊन आली. काहींच्या नोकऱ्या, रोजगार गेले तर लॉकडाऊनमुळे काहींच्या धंद्याला कात्री लागली. वृद्ध आणि चिमुकले काहीही चूक नसताना घरात कोंडले गेले. जीवनातील हे सर्व बदल नैराश्य निर्माण करणारे ठरले आहे आणि अशा काळात प्रेरणा देणाऱ्या, मनात उत्साह निर्माण करणाऱ्या गोष्टींची, लिखाणाची आवश्यकता ओळखून नागपूरच्या हरीश प्रजापती नावाच्या अंध तरुणाने “हम तो जितेंगे” हे पुस्तक लिहिले आहे.
भीती कशी घालवायची, आत्मविश्वास कसा निर्माण करायचा, वेळेचा सदुपयोग कसा करायचा, प्रभावशाली संवाद कसे साधायचे या सारख्या अनेक विषयांवर हरीशने या लिखाण केलंय. विशेष म्हणजे स्वतः अंध असलेला हरीश सामान्य व्यक्तीसारखं पुस्तक वाचू शकत नाही. त्याला स्वतःचा ज्ञानार्जन करण्यासाठी ऑडिओ बुकचा वापर करावा लागतो.