सोलापूर – सध्या दुष्काळ हा खूप भयंकर असून प्रत्येक व्यक्तीने जागृत राहणे काळाची गरज आहे. या दुष्काळात शेती सहित जनावरांना सांभाळणे खूपच कठीण असून प्राप्त परिस्थिती स्वीकारली पाहिजे. या परिस्थितीला धैर्याने सामोर जाण्यासाठी प्रबोधनाची खूप गरज आहे. त्यामुळे ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी 100 कीर्तनातून गावागावात जागृती करण्याचा विजया दशमी निमित्त संकल्प केला आहे. शेतकरी हा सर्वाचा अन्नदाता असून वारकरी संप्रदायाचा मुख्य घटक आहे. शेतकरी आणि वारकरी हे वेगळे नाहीत. या वर्षीचे संकट विचारात घेऊन सर्व कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करावेत. गावागावातील सप्ताह सुद्धा नित्यनेम म्हणून साध्या पद्धतीनेच करावा.
शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यासाठी जनजागृतीची अत्यंत आवश्यकता आहे. पुढील पावसाळ्या पर्यंत प्राप्त परिस्थिती सांभाळणे व मन खचू न देणे ही मोठी जबाबदारी आहे. शेतकरी हा सहिष्णू असून सहनशील आहे. शेतकरी हा निसर्ग व परिस्थिती ओळखून धैर्याने राहणारा आहे. परंतु एखाद्या व्यक्तीने अविचार करून जीवन संपवू नये, आत्महत्या करु नये. प्रत्येक व्यक्तीची त्यांच्या परिवाराला खूपच गरज असते म्हणून कीर्तन श्रावणातून मन सबळ करून धैर्यशील वृत्ती वाढवणे व टिकवणे हा प्रयत्न करण्याचा संकल्प श्री संत मुक्ताई मंदिर, सोलापूर येथे केला आहे. या प्रसंगी तानाजी महाराज बेलेराव, शंकर भोसले, प्रभाकर ताटे, इ. पदाधिकारी उपस्थित होते.











