मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कामाचा सविस्तर आढावा
सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील अनॅलॉमी व नो मॅपिंग मतदारांबाबतची सर्व कामे ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करावीत. यासाठी कामाची गती वाढवून कालमर्यादेत उद्दिष्ट पूर्ण होईल, असे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एसआयआरचे काम १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावयाचे असून, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून अनॅलॉमी व नो मॅपिंग मतदारांशी संबंधित कामे ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करून घ्यावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
करमाळा, माढा, पंढरपूर व बार्शीतील कामांना गती द्या
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पंचनाम्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आल्याने एसआयआरची प्रक्रिया अपेक्षित गतीने सुरू नव्हती. मात्र, आता पंचनाम्यांची कामे पूर्ण झाली असल्याने मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करून घ्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले.
करमाळा, माढा, पंढरपूर आणि बार्शी विधानसभा मतदारसंघांमध्ये एसआयआरचे काम संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले. या मतदारसंघांतील अधिकाऱ्यांनी पुढील दोन दिवसांत कामाचा वेग वाढवावा आणि ३१ ऑक्टोबरपूर्वी संपूर्ण काम पूर्ण होईल, अशा पद्धतीने नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभानिहाय कामाचा सविस्तर आढावा
बैठकीत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व मतदार नोंदणी अधिकारी तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून विधानसभा मतदारसंघनिहाय कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणेचा प्रभावी वापर करावा आणि दैनंदिन कामकाजाचा नियमित आढावा घेऊन गतिमान पद्धतीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे, उपजिल्हाधिकारी (महसूल) लक्ष्मण कासेकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी सीमा होळकर, सुमित शिंदे, सदाशिव पडदुने, तहसीलदार किरण जमदाडे, निलेश पाटील, सरस्वती पाटील यांच्यासह सर्व संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.










