नवी दिल्ली: देशभरातील ओबीसींच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. देशातील वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण लागू करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे ओबीसींच्या वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येते .
ऑल इंडिया कोटा अंतर्गत ओबीसांना वैद्यकीय प्रवेशात एमबीबीएससह पदव्युत्तर अभअयासक्रमासाठीही आरक्षण देण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. लवकरच त्याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण आणि आरोग्य मंत्रालयाची बैठक बोलावली होती. या बैठकीला विधी आणि सामाजिक न्याय विभागाशी संबंधित लोकही उपस्थित होते. यावेळी मोदींनी हे आदेश देतानाच आर्थिकदृष्टा कमकुवतअसलेल्या लोकांच्या आरक्षणावर काम करण्याचे निर्देश दिले.मोदींनी ओबीसींच्या व्होटबँकेवर नजर ठेवून महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आधी अधिकाधिक ओबीसी मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर आता वैद्यकीय प्रवेशात ऑल इंडिया कोटाच्या अंतर्गत ओबीसी आरक्षणाचे सर्व वाद एका झटक्यात निकाली काढले आहेत.
महाराष्ट्राला किती फायदा : देशातील वैद्यकीय प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. वैद्यकीय प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षणाबाबत पंतप्रधानांनी केंद्रीय शिक्षण मंत्री आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. यामुळे दरवर्षी महाराष्ट्रातील 700 ते 800 ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा होणार असून, देशभरात यामुळे हजारो ओबीसी विद्यार्थ्यांना लाभ होणार, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅाक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली.