पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणूक 23 ऑक्टोबर रोजी होत असून महायुती आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर मध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक घेत आहेत. या बैठकीवर शिंदे सेनेने बहिष्कार टाकला आहे. शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला शिक्षक मतदार संघात सचिन सानप यांचा प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आम्ही महायुतीच्या बैठकीला जाणार नाही. शिवाय, आम्हाला निमंत्रण पण नाही ,असे नगरसेवक अमोल शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे पुणे शिक्षक मतदार संघात भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. शिंदे सेनेने सचिन सानप यांना पाठिंबा दिल्यामुळे भाजपचे कौस्तुभ गावडे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर, शिंदे सेनेचे सचिन सानप आणि भाजपचे कौस्तुभ गावडे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. तर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी कडून हर्षदा देशमुख जाधव आणि महायुतीकडून भाजपच्या स्मिता योगेश जाधव यांच्यात दुरंगी सामना होत आहे. शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक रंगतदार होऊ लागली आहे.










