सोलापूर- कुमार व मुली गटाच्या ५२व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत सोलापूर सांगली, पुणे व धाराशिवने कुमार व मुली या दोन्ही गटातून प्रतिस्पर्धी संघावर मात करीत विजयी सलामी दिली.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि सोलापूर ॲम्युचर्स खो-खो असोसिएशन व किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा नेहरूनगर शासकीय मैदानावर मंगळवारी सुरू झाली.
सलामीच्या दिवशी मंगळवारी सकाळच्या सत्रात सर्व सामने एकतर्फीच झाले. कुमार गटात मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे तर मुलींच्या गटात सातारा, नाशिक, रत्नागिरी व ठाणे या जिल्ह्यानेही प्रतिस्पर्धी संघावर दणदणीत विजय मिळविले.
कुमार गटात सिद्धार्थ माने देशमुख यांनी (१. २० मिनिटे व ८ गुण), समर्थ जाधव (२. ०० मिनिटे व आठ गुण) यांच्या अष्टपैलू खेळामुळे सोलापूरने परभणीचा ४३-१८ असा एक डाव राखून धुव्वा उडविला. परभणी कडून शिवराज चिंचवड, कृष्णा पुरोहित, वैभव भालेराव, वैजनाथ पोळे यांनी प्रत्येकी चार गडी बाद करीत लढत दिली.
दुसऱ्या सामन्यात मुंबईने जळगावला ३३-२४ असे ६.२० मिनिटे सहा राखून हरविले. मुंबईकडून विघ्नेश कोरे (२. ००, १. ३० व ६ गुण), अंश कदम (१. ३० मि. ६ गुण) आणि अष्टपैलू कामगिरी केली. जळगावकडून आयर्न पवार (१.०० नाबाद , १. ३० व ६ गुण ) याची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.
मुली गटात सोलापूरने बीडवर ४१-१२ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला. प्राजक्ता बनसोडे (२. ३९, १. ४० मि. व ८ गुण) व स्नेहा लामकाने (३. ०५ व ६ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. बीडकडून दुर्गा नाईकनवरे व श्रद्धा खारे (१. १०मि.) यांनी प्रत्येकी दोन गुण मिळविले.
दुसऱ्या सामन्यात रत्नागिरीने रायगडला ३०-२६ असे एक डाव राखून नामविले. रत्नागिरीच्या तन्वी खानविलकर हिने आठ गुण मिळवित १. २० मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळली. साक्षी लिंगायत तिनेही सहा गडी बाद करीत १. १० मिनिटे पळती केली. रायगडच्या प्रज्ञा गाडे हिने तब्बल 12 गुण मिळवीत १. ५० मिनिटे संरक्षण केले.
अन्य निकाल कुमार गट : सांगली विजयी विरुद्ध लातूर ४५-६ (एक डाव राखून), धाराशिव विजयी विरुद्ध नंदुरबार ३९-१२, पुणे विजयी विरुद्ध नांदेड ४८-२० (एक डाव राखून), मुंबई उपनगर विजयी विरुद्ध रायगड ४४-३४ (५.२० मिनिटे राखून ), ठाणे विजयी विरुद्ध सिंधुदुर्ग ४९-१२.
मुली गट : सांगली विजयी विरुद्ध जळगाव ३३-१६( एक डाव राखून), सातारा विजयी विरुद्ध हिंगोली ३८-४ ( एक डाव राखून), पुणे विजयी विरुद्ध नांदेड ४२-१२( एक डाव राखून), नाशिक विजयी विरुद्ध सिंधुदुर्ग ५४-१० ( एक डाव राखून), ठाणे विजयी विरुद्ध लातूर ५२-१२( एक डाव राखून), धाराशिव विजयी विरुद्ध छत्रपती संभाजी नगर ४८-१० ( एक डाव राखून).











