सोलापूर : कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जात आहेत. जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या ६३७ गावांमधील ३४५ शाळा गुरुवारपासून सुरू होणार आहेत. सकाळी साडेसात ते साडेअकरा या वेळेत अकरावी-बारावीचे वर्ग तर, साडेअकरा ते साडेचार या वेळेत आठवी ते दहावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असून त्यात बालकांना सर्वाधिक धोका असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही, शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय घेताना शिक्षणमंत्र्यांनी स्वत:च्या विभागाकडे काहीच अधिकार ठेवले नाहीत. शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांची संमती, ग्रामसभेचा ठराव बंधनकारक केला आहे. परंतु, पालकांच्या संमतीविनाच सर्वसामान्यांची मुले शाळेत येत असल्याचे चित्र आहे. राज्यातील जवळपास सात लाख पालकांचा अभिप्राय घेण्यात आला असून त्यात ८६ टक्के पालकांनी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे विविध शाळांना भेटी देऊन मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.










