कॅथलॅबसह विविध वैद्यकीय विभागांची केली पाहणी; रुग्णांना मिळणाऱ्या उपचार सुविधांचा घेतला आढावा
सोलापूर : ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज सोलापूर येथील महिला व नवजात शिशु रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध वैद्यकीय विभागांची पाहणी करून रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या उपचार सुविधा व आरोग्य सेवांचा आढावा घेतला.
पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबची पाहणी करून त्याच्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच नेत्र विभाग आणि अतिदक्षता विभागाला भेट देऊन तेथील उपचार व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि रुग्णसेवेबाबत संबंधित डॉक्टरांकडून माहिती जाणून घेतली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना मिळणाऱ्या सेवांबाबतही त्यांनी विचारपूस केली.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, आरोग्य अधिकारी वर्षा डोईफोडे तसेच रुग्णालयातील डॉक्टर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.















