आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साधणार जनतेशी थेट संवाद
सोलापूर – राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रा’ आयोजित करण्यात येत आहे.
१ नोव्हेंबरला नांदेड येथून शुभारंभ झालेली ही यात्रा ५ डिसेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे. *या यात्रेचा सोलापूर जिल्हा टप्पा दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे.
या यात्रेच्या माध्यमातून आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून, राज्यातील आरोग्यसेवांचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.
३५ दिवस चालणारी यात्रा; १० लाख लोकांपर्यंत पोहोचणार
‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाशी यात्रेची सांगड घालून सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, आजारांचे नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती केली जाणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांमध्ये ग्रामपातळीवरील सहभाग वाढविण्यावरही भर राहणार आहे.
सेवांचा आढावा घेतला जाणार
आरोग्य योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत किती प्रमाणात पोहोचतो, आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि रुग्णसेवेत कोणत्या अडचणी येतात, याचा आढावा यात्रेत घेतला जाणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे. आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा, महानगरपालिका, स्त्री मनोरुग्ण आणि विशेष रुग्णालयांपर्यंतच्या सेवांचाही आढावा घेतला जाणार आहे.
आरोग्य संवाद यात्रेची ठळक वैशिष्ट्ये –
या आरोग्य संवाद यात्रेत १२५ नवीन संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सोबतच जिल्हा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, विधानसभा मतदारसंघ समिती, रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समिती, ग्राम आरोग्य, पोषण स्वच्छता समिती यापैकी एका समितीसोबत बैठक व चर्चा करण्यात येईल.
राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शाळा व अंगणवाडींना भेट देऊन या योजनेचा आढावा घेतला जाईल. महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेत अंगीकृत रुग्णालयांना भेट देऊन खाजगी डॉक्टर व रुग्णांशी संवाद साधला जाणार आहे.
तसेच पॅलिएटिव्ह केअर, सिकलसेल, संस्थात्मक प्रसूती झालेल्या माता, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया झालेली बालके, क्षयरोग, कुष्ठरोग, जननी सुरक्षा योजना लाभार्थी, कर्करोग तपासणीतील रुग्ण, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतलेले रुग्ण यांच्याशी संवाद साधण्यात येईल.
आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न
या ३५ दिवसांच्या यात्रेदरम्यान राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमधील औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता, स्वच्छता, रुग्णालय व्यवस्थापन आणि उपचार सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे. नागरिक, रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून आरोग्य सेवेमधील त्रुटी दूर करणे हा मुख्य उद्देश आहे.
नागरिकांच्या गरजा समजून घेणे, आरोग्य सेवांमधील त्रुटी ओळखणे आणि प्राप्त सूचनांच्या आधारे सुधारणा घडवून आणणे, या उद्देशाने आयोजित करण्यात येणारी आरोग्य संवाद यात्रा राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या यात्रेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि विविध आरोग्य योजनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत.
तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी या यात्रेत सहभागी होऊन हि यात्रा यशस्वी करावी.










