सोलापूर – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आज कवायत मैदान, पोलीस मुख्यालय येथे विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात पोलीस अधिकारी, अंमलदार आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत योगाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला पोलीस आयुक्त एम. राजकुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त वृष्टी जैन, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, परिमंडळ अधिकारी प्रीतम यावलकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी, अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.
या योग शिबिरामध्ये योग प्रशिक्षक योगाचार्य विश्वंभर घोलप आणि योगाचार्य बापूराव जगताप यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त विविध प्राणायाम, श्वसनक्रिया तसेच शरीर निरोगी, सुदृढ आणि लवचिक ठेवण्यासाठी आवश्यक योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. उपस्थितांना विविध योग प्रकारांचे प्रशिक्षणही देण्यात आले.
या शिबिरात सुमारे २०० अधिकारी, अंमलदार आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते, कामातील ताणतणाव कमी होतो तसेच सकारात्मक ऊर्जा मिळते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने योगाला स्थान देऊन तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन त्यांनी केले.उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या योग शिबिरातून पोलीस दलामध्ये आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचा संदेश देण्यात आला.













