यशवंतराव चव्हाण युवा राज्य पुरस्कार स्पाईस एंन आईस इव्हेंट्सचे डायरेक्टर अनीश सहस्त्रबुद्धे यांना प्रदान

0
15

राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचे खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वितरण

 • मुंबई : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी वेगवेगळ्या पदावर असताना घेतलेले निर्णय आणि मांडलेल्या विचारांचे डॉक्युमेंटेशन करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ही माहिती दिली. चव्हाण सेंटरच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यशवंतराव चव्हाण युवा राज्य पुरस्कार सोलापूरचे स्पाईस एंन आईस इव्हेंट्सचे डायरेक्टर अनीश सहस्त्रबुद्धे यांना प्रदान आला.
 • रंगमंचीय कलाविष्कार, क्रीडा, साहित्य, सामाजिक, उद्योग, पत्रकारिता आणि नवनिर्मिती या विषयांत उल्लेखनीय काम करणाऱ्या एकूण सात युवक आणि नऊ युवतींना यावेळी खासदार सुळे यांच्या हस्ते राज्यस्तरीय युवा पुरस्कार देण्यात आले. सन्मानपत्र आणि २१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, सीईओ दिप्ती नाखले, अभिनेता आणि दिग्दर्शक भरत दाभोळकर, आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, ज्येष्ठ साहित्यिक प्रज्ञा दया पवार, ऐश्वर्य पाटेकर, दिपाली चांडक, डॉ. शालिनी दाभोळकर, डॉ. दिपा भजेकर, चव्हाण सेंटरचे विश्वस्त, पदाधिकारी, सदस्य, निवड समितीचे सदस्य आदी याप्रसंगी उपस्थित होते.
 • यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या, ‘महिलांसाठी केंद्र व राज्य सरकारने वन स्टाॅप सेंटर सुरु केली आहेत. त्याठिकाणी महिलांना मदत करण्यासाठी चव्हाण सेंटर प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर ज्यांना मदत केली आहे. ते ज्या विषयात तज्ज्ञ असतील त्या ठिकाणी त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चव्हाण सेंटरने खासदार शरद पवार साहेबांच्या नावाने फेलोशिप सुरू केली आहे. कृषी, साहित्य, शिक्षण या विषयात ती फेलोशिप दिली जाते. आगामी दहा वर्षात या फेलोशिप प्राप्त ५०० जणांच्या अनुभवाचा वापर महाराष्ट्राच्या विकासासाठी करुन घेता येईल, असा चव्हाण सेंटरचा मानस आहे.
 • अत्यंत उत्साहात आणि युवक ,युवतींच्या जल्लोषात चव्हाण सेंटरमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अनेक तरुणांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी यावेळी संवाद साधला. अक्षय शिंपी यांनी काही कवितेच्या ओळी म्हणत अत्यंत ओघवत्या शब्दांत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर रणजित बायस यांनी सर्व उपास्थितांचे आभार मानले.
 • यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त युवक युवतींची नावे पुढील प्रमाणे –
  युवा क्रीडा पुरस्कार – हर्षदा गरुड(वेट लिफ्टिंग), रुद्रांक्ष पाटील (नेमबाजी)
  सामाजिक युवा पुरस्कार– हेमलता पाडवी (नंदूरबार) व प्रवीण निकम (पुणे)
  रंगमंचीय कलाविष्कार (परफॉर्मिंग आर्ट्स) – नृत्य – मुग्धा डिसोजा (पुणे),
  लोककला – सुमित धुमाळ, गोंधळ (औरंगाबाद) नाट्यविभाग – महेश खंदारे
  युवा साहित्यिक पुरस्कार – अमृता देसर्डां (पुस्तक : आत आत आत, पुणे)
  पवन नालट (पुस्तक : मी संदर्भ पोखरतोय, अमरावती)
  युवा उद्योजकता पुरस्कार – अनिता माळगे (सोलापूर) आणि अनीश सहस्त्रबुद्धे (सोलापूर)
  युवा पत्रकारिता पुरस्कार आणि इनोवेशन युवा पुरस्कार दोन विभागांमध्ये नव्याने पुरस्कार देण्यात आले
  पत्रकारिता युवा पुरस्कार – शर्मिष्ठा भोसले (मुंबई) व मुस्तान मिर्झा (उस्मानाबाद)
  इनोव्हेशन युवा पुरस्कार – दिव्यप्रभा भोसले (पुणे), सारंग नेरकर (ठाणे) आणि सुमित पाटील (मुंबई)