अजितदादा, तुमच्या आमदारामुळे राज्य नासत चाललं आहे, त्याला पाठीशी घालू नका, आम्हाला न्याय द्या अशी मागणी दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखने केली. त्यांच्यासारख्या लोकांमुळे आमच्यासारख्यांचे जगणं मुश्कील झालं असल्याचं वैभवी देशमुख म्हणाली. ज्या खंडणीसाठी माझ्या वडिलांचा जीव गेला ती कुणासाठी मागितली जात होती? माझ्या वडिलांचा गुन्हा काय होता? असे प्रश्नही तिने विचारले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्वधर्मीय मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संतोष देशमुखांची मुलगी वैभवीला अश्रू अनावर झाले.
अजित पवारांना विनंती आहे की माझे वडील गेलेत आम्ही न्याय मागतोय. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करा. तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे हे राज्य नासत चालले आहे.त्याला तुम्ही पाठीशी घालू नका. त्यांच्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्कील झालं आहे.
अजित दादांना विनंती करते की या आधीही अनेक प्रकरणे घडली आहेत. त्याची सुद्धा सखोल तपासणी करा. अजितदादा हे असे व्यक्तिमत्व आहे की ते खऱ्याचं खरं करतात, खोट्याचं खोटं करतात. या प्रकरणात सुद्धा त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा असं वैभवी देशमुख म्हणाली.










