सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेतील परीक्षा केंद्राची (Vidyamandir School Examination Center) ‘स्ट्राँग रूम’ (Sangola Strong Room) फोडून एका विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका चोरल्याचे (50 Question Papers Stolen) उघडकीस आले. मात्र, संबंधित भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका कुठेही व्हायरल झाली नसल्याने भूगोल विषयाचा पेपर नियोजित वेळेत होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी ‘एज्युवार्ता’शी बोलताना सांगितले. दरम्यान परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने संबंधित परीक्षा केंद्र प्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीची परीक्षा घेतली जात असून उद्या भूगोलाचा पेपर नियोजित वेळेत होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यात एका केंद्रावर स्ट्रॉंग रूम फोडून प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रश्नपत्रिका चोरीला गेल्यामुळे उद्या होणारा भूगोलाचा पेपर रद्द होणार की नियोजित वेळेत घेतला जाणार ? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, हा पेपर नियोजित वेळेत होणार असल्याचे राज्य मंडळांने स्पष्ट केले आहे.

